श्रीरामवरदायिनी देवी मंदिर

प्रार्थना आणि आरती

देवीप्रती भक्तिपूर्ण प्रार्थना

माते तुझ्या चरणि आश्रय देसि आम्हा ।
तेणेचि नित्य मनि। तुष्टी घडे, प्रकामा ।
लागो तुझ्या भजनी हे मन साच नित्य ।
याहून अन्य जगदंब न कांक्षी चित्त ।। १ ।।

सर्वस्व तूच आमुचे जगदंब माते ।
आम्ही तुझे प्रिय शिशुच दुजे न नाते ।
वाठो कसाही गुणहीन सदा जना मी ।
तूं माय एक करिसी मम चोज नामी ।। २ ।।

नारायणी त्रिपुर सुंदरी विश्वमातर ।
बाले शिवे परशिवे आयि शुभकांते ।। १ ।।
अंबे जगत जननी मां परिपाही नित्यं ।
इत्यं स्मरत्व निशमेव मदीय चितं ।। २ ।।

या देवी सर्व भूतेषु मातृरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।

रामवरदायिनी माता। गर्द होऊनी उठली ।
मर्दिले पूर्वेचि पापी। आनंदवन भूवनी ।।
प्रत्यक्ष चालिली राया। मूळमाया समागमे ।
नष्ट चांडाळ ते खाया। आनंदवन भूवनी ।।
भक्तासी रक्षिले मागे। आतांहि रक्षिते पहा ।
भक्तासी दिधले सर्वे। आनंदवन भूवनी ।।
देव भक्त येक झाले। मिळाले सर्व जीवही ।
संतोष पावले तेथे। आनंदभूवनी ।।

— समर्थ रामदास स्वामी

देवीच्या आरत्या

आरती १

दुर्ग दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारीं ।
वारीं वारीं जन्ममरणांते वारी ।
हारी पडलों आता संकठ निवारी ।।

जयदेवी जयदेवी महिषासुरमथिनी ।
सुरवरईश्वरवरदे तारकसंजिवनी ।।

त्रिभुवनभुवनी पहातां तुजऐसी नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलवे कांहीं ।।
साहीं विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तांलांगी पावसी लवलाही ।।

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशांपासुनि सोडी तोडीं भवपाशा ।।
अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा ।
नरहर तल्लीन झाला पदपंकजलेशा ।।

आरती २

आश्विनशुध्दपक्षी अंबा बैसलि सिंहासनीं हो ।

प्रतिपदेपासूनी घटस्थापना ती करुनी हो ।

मूलमंत्र जप करुनी भोंवते रक्षक ठेवूनी हो ।

ब्रह्मा विष्णु रुद्र आईचे पुजन करिती हो  ।

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।

उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो  ।।धृ।।

द्वितीतीयेचे दिवशी मिळती चौसष्ठ योगीनी हो ।

संकळामध्ये श्रेष्ट प्रशू-रामाची जननी हो ।

कस्तुरी मठवट भांगी शेंदूर भरुनी हो ।

उदोकारें गर्जती सकळ चामुंडा मिळुनी हो, उदो …. ।। २ ।।

तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो ।

मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळां हो ।

कंठीची पदके कांसे पीतांबर पिवळा हो ।

अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो, उदो…. ।। ३।।

चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो ।

उपासका पाहसी प्रसन्न अंतःकरणी हो ।

पूर्णकूपे जगन्माते मनमोहिनी हो ।

भक्ताच्या माऊली सुर ते येती लोटांगणी हो, उदो…. ।। ४।।

पंचमीचे दिवशी व्रतते उपांगललिता हो ।

अर्ध्य-पाद्य-पूजीने तुजला भवानी स्तविती हो।

रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो ।

आनंदे प्रेम ते आले सदभावे क्रीडतां हो, उदो…. ।। ५।।

षष्टीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो ।

घेवूनि दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो ।

कवडी एक अर्पितां देशी हार मुक्ताफळां हो  ।

जोगवा मागता प्रसन्न झाली १क्तकुळां हो, उदो…. ।। ६।।

सप्तमीचे दिवशी सप्तशृंगगडावरी हो  ।

तेथें तूं नांदसी भोवतीं पुष्षें नानापरी हो ।

जाई जुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो ।

भक्त संकटी पडतां झेलुनि घेसी वरचेवरी हो, उदो…. ।। ७।।

अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो ।

सह्याद्रिपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो ।

मन माझे मोहिले शरण आलो तुज लागुनी हो ।

स्तनपान देऊनी सुखी केले अतःकरणीं हो, उदो…. ।। ८।।

नवमीचे दिवशी नवव्या दिवसांचे पारणे हो ।

सप्तशतीजप होम हवने सद्‌भक्ती करुनी हो ।

षडूस अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो  ।

आचार्य ब्राह्मणां तृप्त केले त्या कृपेकरुनी हो, उदो….।। ९।।

दशमीचे दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो ।

सिंहारुढ करी दारुण शस्त्रे अंबे त्वां घेऊनी हो ।

शुंभनिशुंभादेक राक्षसा किती मारिसी रणीं हो ।

विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो, उदो… ।। १०।।

Scroll to Top